गर्भधारणा आणि आयुर्वेद

गर्भधारणा होणे हे प्रत्येक स्त्रीच्या आयूष्यातील एक अत्यंत आनंददायक क्षण असतो. आरोग्यदायक, उत्तम शारिरीक, मानसिक व बौद्धिक क्षमता असणारी संततीची अपेक्षा प्रत्येक दांपत्याची असते. त्यासाठी सगळ्या बाबींचा विचार  आयुर्वेद शास्त्रात विस्त्रुत पणे वर्णन केलेला आहे. ते पुढील प्रमाणे –

|| ध्रुवं चतुर्णां सान्निध्यात् गर्भः स्यात् विधिपूर्वकम् | ऋतु क्षेत्राम्बुबीजानां सामग्र्यात् अंकुरो यथा || सु.शा.

गर्भधारणा म्हणजे केवळ स्त्रीबीज व पुरुष शुक्राचे मिलन नाही तर त्यासाठी माता पित्यांची शारिरीक व मानसिक अवस्था सुद्धा सशक्त असावे लागते. ज्या प्रमाणे उत्तम पिकासाठी चांगली मशागत केलेली जमीन, योग्य काळ, पिकाच्या वाढीसाठी आवश्यक जल व संपन्न बीज हे सर्व घटक जरुरी आहेत तसेच गर्भधारणेसाठी ऋतु, क्षेत्र, अंबू, बीज हे चार घटक आपल्या उत्तमोत्तम गुणांनी संपन्न असावेत.

१. ऋतू – ऋतू म्हणजे काळ. काळ या घटकाचा विचार ३ प्रकारे होतो

    अ) आयुर्वेदानुसार गर्भधारणेसाठी सक्षम अशा स्त्रीचे किमान वय १६ वर्ष व पुरुषाचे वय २५ वर्ष असावे.

    ब) स्त्रिची मासिक पाळी दर महीन्याला नियमितपणे यायला हवी. मासिक रज:स्रावापासून पहिल्या १६

           दिवसांत गर्भधारणा झाल्यास होणारी संतति निरोगी, अयुष्यमान व बुद्धिमान होते.

    क) गर्भधारणेचा काळ नेहमी रात्री असावा. गर्भधारणेसाठी दिवसा मैथून कर्म वर्ज्य सांगीतला आहे.

२. क्षेत्र – क्षेत्र म्हणजे गर्भाशय, जेथे गर्भाची वाढ पुढील ९ महिने होणार असते. गर्भाशयाचे बल, दोषावस्था, शारिरीक रचना व आकार योग्य असणे आवश्यक आहे, अन्यथा पुढे गर्भधारणा टिकवणे अवघड होते किंवा गर्भपाताची शक्यता असते. जसे जसे गर्भाची वाढ होत जाते तशी गर्भाशयातील अवकाश (पोकळी) वाढणे आवश्यक असते. गर्भाशयातील स्नायूंना गर्भाचे वजन सहन होणे गरजेचे असते. गर्भाशय मुख अतिसंकुचित असल्यास संबंध येणे जवळ जवळ अशक्य असते अशावेळी त्यावर उपचार करावे लागतात. गर्भाशय मुख जर अतिविस्त्रुत असल्यास गर्भधारणा झाली तरी गर्भपाताची शक्यता अधिक असते.

   ३. अंबू – अंबू म्हणजे जल म्हणजेच गर्भाच्या वाढीसाठी लागणारा पोषक अंश. गर्भाचे पोषण हे गर्भनाभीनाडी द्वारे होत असते, मातेच्या आहारावर व तिच्या शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्यावर ते अवलंबून असते.

४. बीज – गर्भाच्या उत्पत्तीसाठी स्त्रीशुक्र(आर्तव) व पुरुषाचे वीर्य यांचा संयोग होणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे सकस बीजाची पेरणी केल्यावर येणारे पीक दर्जेदार असते, तसेच सशक्त अशा प्रजोत्पादनासाठी माता पित्यांचे बीज दोषविरहित असावे. आयुर्वेद शास्त्रात शुद्ध शुक्र व शुद्ध आर्तवाचे गुण;त्यांचे दोष आणि त्यासाठी चिकित्सा वर्णिली आहे.

अशाप्रकारे गर्भधारणेची पूर्वसामग्री आयुर्वेद शास्त्रानुसार मांडली आहे.

गर्भधारणेचे पुर्वनियोजन करतांना वरील सर्व बाबींच्या विचाराबरोबर शरीर शुद्धिकरणाचा विचारही महत्वाचा ठरतो. गर्भाशय हा मुख्यतः कटी प्रदेशातील अवयव असुन त्याठीकाणी वाताचे बाहूल्य असते, शरिरातील इतर दोषावस्थानुसार व स्वस्थ व्यक्तीत सुद्धा शरीर शोधनार्थ पंचकर्माचा प्रयोग करावा लागतो.

कफ दोषाधिक्यात (पृथ्वी + जल तत्व) – वमन

पित्त दोषाधिक्यात (जल + तेज तत्व) –  विरेचन

वात दोषाधिक्यात (वायू + आकाश) – बस्ती

गर्भाशयाचे बल वाढवण्यासाठी, मासिक पाळीच्या तक्रारींसाठी अनुवासन, निरुह बस्ती दिले जातात.

गर्भाशयमुख संकूचित असल्यास – स्थानिक पिचू व धावान चिकीत्सेने गर्भाशयमुखाचे विवरण व गर्भाशय शैथिल्य दुर होण्यास मदत होते. यासोबतच गर्भाशयातील अवकाश वाढवता येतो.

उत्तर बस्ती चिकित्सा गर्भधारणेसाठी गर्भाशयात विशिष्ठ औषधी द्रव्य प्रविष्ठ केले जाते. शोधनोत्तर रसायान चितकित्सा देणे अधिक फलदायी ठरते, ह्यात दुध, तुप, लोणी, बदाम, खारीक, बेदाणे, काळ्या मनुका, सुके अंजिर, चारोळ्या, खजुर, डाळींब, पंचामृत, खडीसाखर, विविध प्रकारच्या खिरी, फळ इत्यादींचा आहारामध्ये समावेश करावा.

तर आता, गर्भधारणेसाठी पुर्वतयारी करतांना या सर्वंगोष्टी आणि काळाचा विचार करुनच यशस्वी प्रयत्न करावा.