आपल्या घरात, नातेवाईक,शेजारी, मित्र परीवार ह्यापैकी कितीतरीजणं सकाळी उठून गरम पाणी आणि मध वर्षानुवर्ष घेतात – कारण विचारल्यास – वजन कमी होतं म्हणे. आता हे कोणी आणि कुठे म्हटलं आहे, हे कोणालाच माहिती नाहि.

ह्या लेखात आपण मधाचे ग्रंथाोक्त गुणधर्म आणि मध सेवन करण्याचे नियम बघुया. 

“चक्षुष्यं छेदि तृट्श्लेष्माविषहिध्मास्रपित्तनुत् | मेहकुष्ठकृमिच्छर्दिश्वासकासातिसारनुत् ||

  व्रणशोधनसंधानरोपणं वातलं मधु | रुक्षं कषायमधुरं तत्तुल्या मधुशर्करा ||

  उष्णमुष्णार्तमुष्णे च युक्तं चोष्णैर्निहन्ति तत् |” वा.सू.५/५२

 

मध डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितकारक आहे, कफ नाशक असल्याने नेत्रांच्या ठिकाणी असणारा क्लेद दुर करुन दृष्टि सुधारते. ज्यांची नजर कमजोर अाहे त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी १चमचा त्रिफळा चूर्ण मधासोबत घ्यावे.

मध कफ अाणि मेदनाशक असून  रूक्ष, छेदन आणि लेखन (खरवडून काढणे) करणारं आहे अाणि म्हणूनच   वजन कमी करण्यास मदत करते, पण ते योग्य अौषधाच्या सोबत घेणे गरजेचे अाहे, गरम पाण्यासह नाहि.

अति तहान लागणे, कण्ठशोष, उचकी लागणे इ. विकारात मध नुसते, अथवा पाण्यासोबत थोडे थोडे सेवन केल्यास आराम मिळतो.

मेह, त्वचा विकार, कृमि ह्यासारख्या विकारात औषधि मधासह घेतली असता, औषधांचा गुण लवकर येतो, तसेच मधामुळे ह्या व्याधींमधे असणारा क्लेद कमी होऊन उपशय मिळतो.

त्वचा तेलकट असल्यास हलक्या हाथाने चेहर्यावर मध जिरवावे आणि पाण्याने धुवावे.‌‌‌‌‌‌‌‌‍

सर्दि आणि खोकल्यामधे मधाचे फायदे सगळ्यांना माहिती आहेतच. घशात आणि छातीत अडकलेला कफ  मधामुळे मोकळा होतो. तुळशीचा रस,आलं, मध अाणि हळद हे तर जणू कफाचे शत्रुच.

मध रुक्ष असल्याने वातवर्धक आहे, तसच चवीला गोड असला तरीहि अल्पशः तुरट आहे, क्लेदनाशक असून कुठलाहि व्रण स्वच्छ करुन (जखम) भरुन काढण्यास उत्तम आहे. मग तो साधा मुखपाक (oral ulcer) असो वा एखादि मोठी जखम; शास्त्रोक्त पद्धतीने त्याची यथासांग निगा राखुन मधाचा त्यावर वापर केल्यास व्रण लवकर बरा होतो.

मध सेवनाचे नियम 

ग्रंथात वर्णन केलेल्या विरुद्ध अन्नाच्या यादितील एक निषिद्ध म्हणजेच –  मध कधीहि गरम करू नये, अथवा गरम पाणी किंवा गरम खाद्य पदार्थांसह सेवन करु नये. एवढच नाहि तर उष्ण ऋतु मधेदेखील गरजे पुरताच सेवन करावा. आणि हे उगाच कुठेहि म्हटलेल नाहि, तर आयुर्वेदिय ग्रंथात धडधडीत लिहिलेले आहे.

आपण जाहिरातींना भुलून काहि गोष्टी करत असतो –

जसे गरम पाणी आणि मध,      गरम पोळी सोबत, गरम केक्स, बरेच डेसर्ट्स सोबत, दुधासोबत मध घेतला जातो, किंवा काहि पदार्थ बनवतानाच त्यात मध घालुन शिजवले जातात. 

आयुर्वेदानुसार- मध हा विविध फुलांपसून जमा केला जातो, ह्यातील काहि फुलं विषारी असण्याची शक्यता नाकारता येत नाहि. विष हे गरम केल्यास अथवा उष्णतेच्या संपर्कात आल्यास अधिक कार्यक्षम होते, आणि शरिरास अपायकारक ठरते. तसेच मध गरम केले असता त्यतील संघटन बिघडून,त्याचे अपचन होऊन आमोत्पत्ति होते, आणि  अशी आमोत्पत्ति चिकित्सा करण्यास अवघड असते.

चला तर मग ह्या बहुगुणी मधाचा वापर योग्य पद्धतीने करुया, फक्त वजन कमी करण्यसाठी नाहि तर आपले आरोग्य टिकवण्यासाठी.