“सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी, पूर्वी प्रेम….”, अशा सर्व आरत्यांचा गजर आणि “गणपति बाप्पा मोरया”, असा जयघोष, उत्साह आणि आनंद जवळ जवळ सर्व घरांमधे ह्या गणेशोत्सवात आपण अनुभवत असतो, त्या आनंदाला जोड देणारा एक दुग्धशर्करा योग म्हणजे ‘उकडीचे मोदक’, फक्त गणपति बाप्पाच नाहि, तर आपल्या सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं उकडीचे मोदक म्हटल्यावर.

त्याची पाककृति तर सगळ्यांनाच माहिती आहे, आपण इथे त्याचे शास्त्रिय महत्व पाहणार आहोत. आपल्या पूर्वजांनी आपले सणवार, त्या दरम्यान असणारा काळ, ऋतु, शारिरीक दोषांची अवस्था ह्या सगळ्याचा विचार करुनच त्याला साजेश्या पाककृतिंचे नियोजन केले आहे.

गणेशोत्सवाचा आरंभ भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला होतो. भरपुर पाऊस, तुडूंब वाहणार्‍या नद्या – म्हणजेच वर्षा ऋतुचा अगदी शेवटचा काळ – वातावरणात गारवा, ओलावा आणि कोंदटपणा अधिक वाढलेला असतो, ह्या सगळ्याचा परीणामत: शरीरात अन्नपचन व्यवस्था मंदावते, वात वाढतो, आणि परिणाम स्वरुप रूक्षता, वातविकार अाणि थकवा आपले डोके वर काढतात. वर्षा ऋतु   संबंधित अधिक माहितीसाठी – The Monsoon Health Care  ,  वर्षा ऋतु आणि आरोग्य – बस्ति चिकित्सा

उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारा ओला नारळ(खोबरं), हे चवीला गोड, स्निग्ध, पौष्टिक आणि वात व पित्त कमी करणारे आहे. त्यासोबत वापरला जाणारा गुळ हा सुद्धा उत्तम वातशामक, अग्निवर्धक, पौष्टिक आहे. वेलचि, जायफळ हे सुगंधि द्रव्य पाककृतिची चव वाढवणे, पचन सुधारण्यास, अजिर्ण, पित्तशामक व सर्दि,पडस्या सारख्या पावसाळी तक्रारिंवर गुणकारी आहे.

खसखस ही देखिल पचन सुधारण्यास मदत करते, थकवा दूर करते. हे चविष्ट सारण  भरण्यासाठी लागणारं बाहेरच आवरण, तांदळाच्या पिठीची छान उकड बनवून तयार केले जाते, तांदुळ मुळात पचण्यास हलके, त्यात उकड काढल्यामुळे      झालेल्या अग्निसंस्कारामुळे ते अधिक पथ्यकर बनते. शिवाय तांदुळ मधुर रसात्मक असून शक्तिवर्धन करणारे आहे, नारळ जरी पचनास जड असला तरी वेलची, जायफळ, खसखस, व तांदुळ हे मोदक पचवणे सोपं बनबतात, शिवाय हा आकर्षक असा दिसणारा मोदक पुन्हा उकडल्यामुळे अजून चवदार, पौष्टिक आणि पचण्यास सुलभ बनतो.  वरुन केशर लावले असल्यास त्याचे रुप अजुन खूलते आणि वातनाशक गुण सुद्धा मिळतो.

ह्या रुचकर तयार झालेल्या गरम गरम मोदकावर, तूपाची धार धरुन खाल्ल्यास कोण आनंद..?

सारंश असा की उकडीचे मोदक अत्यंत रोचक असुन, आपल्या स्निग्ध गुणामुळे वात दोष व वातविकार (धातुक्षयजन्य) शमन करणारे आहेत.चविला गोड असल्याने पौष्टिक, उत्साह वाढवणारे, शुक्रल, आणि वातशामक, अस्थि व मांस धातुंस बल देते. मनाला आनंद देणारे (तर्पण करणारे) आहेच. मुख्य म्हणजे वातावरणातील बदलांमुळे बिघडलेल्या शारिरीक संतुलनाचे, आपल्या स्निग्ध,किंचित् उष्ण, वातघ्न व कफकर गुणांनी नियमन करते. हे सगळे फायदे असले तरीदेखिल बाप्पासारखे २१ मोदक एकावेळेस फस्त करण्याची चूक करु नये. गणेशोत्सवाचा आनंद घेऊन आरोग्याची देखिल काळजी सर्वांनी घ्यावि. गणपति बाप्पा मोरया….